मी उजवा हात खिशातून काढतो। बाजूला उभ्या तुझा हात माझ्या हातात घेतो। तो स्पर्श मला जाणवण्यापेक्षा आता समोर दिसत राहतो। सूर्य त्याच्या प्रतिबिंबामध्ये विरघळत राहतो, हळुहळू... "मला तुला काही सांगायचय", मी सूर्याकडे बघून म्हणतो। तू समोर येवून माझ्या मिठीत विरघळतेस। माझी नजर अजूनही त्या बुडणारृया सूर्यावर आहे। बस्स... आता फ़क्त काही क्षण, तांबड्या आकाशाखालचे! आता नजर सूर्याऐवजी प्रतिबिंबावर भिरभिरते। स्वताःपुराताच उजेड राखून ठेवून सूर्य आता जवळजवळ नाहीसा झालाय। आणि तशीच नाहीशी होतेय तुझी माझ्या मिठीतली जाणीव। वारयावर फ़डफ़डणारया कपड्यांच्या आवाजात मी ते प्रतिबिंब शोधायचा प्रयत्न करतोय।
दोन्ही हात खिशात घालून मी बराच वेळ तुझी वाट पाहतोय। सूर्य बुडाल्यानंतरच्या उजेडात तुझं नसणं खूप तीव्रतेने जाणवतं। वाट चुकलेला वारा माझ्या अवती भवती तुला शोधत राहतो। आता त्यालाही उजेडाची गरज उरली नाहीये... माझ्यासारखीच...
